Friday, 25 April 2014

श्री दत्त देवस्थान ट्र्स्ट, सावेडी, अहमदनगर


अहमदनगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना दत्तावतारी सत्पुरुष प.पू.श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी १९७४ मध्ये केली. वेदविद्येचे संरक्षण व संवर्धन हा ह्या ट्रस्टच्या स्थापनेचा प्रमुख हेतु आहे. आपली ही प्राचीन विद्या काळाच्या ओघात लोप पावू पहात आहे. वेदांच्या अनेक उपशाखांपैकी (सुमारे ११००) आजमितीला काही मोजक्याच शाखा अस्तित्वात आहेत व त्यातील जाणकारांची संख्याही अत्यंत अल्प आहे. पूर्वी राजाश्रयाच्या आधारे ही विद्या जतन केली गेली. आज लोकाश्रयाच्या आधारावर तिचे जतन करणे आवश्यक आहे, हे ओळखून प.पू.सदगुरुंनी ट्रस्टची स्थापना केली.
वेदविद्या ही आपल्या धर्माचा पाया आहे. वेद हे अपौरुषेय आहेत. वेद ऋषिमुनींना ध्यानावस्थेत ऐकू आले, त्यांनी वेदांचे उच्चारण केले व आपल्या शिष्यांना शिकवले. वेद हे मंत्रस्वरुपात असून त्यांच्या उच्चारणाला फार महत्त्व आहे. योग्य व्यक्तींकडून त्यांचे शास्त्रशुध्द उच्चारण झाल्यास ईश्वरी शक्ती प्रकट होते. वेदांच्या उच्चारण झाल्यास ईश्वरी शक्ती प्रकट होते. वेदांच्या उच्चारणाने सर्वच जीवसृष्टीवर चांगले परिणाम होतात. वेद अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत.
वेदविद्या ही पाठांतरावर आधारित विद्या आहे. वेदध्ययनात योग्य उच्चारांना फार महत्त्व असल्याने वेद गुरुमुखातूनच शिकावे लागतात. वेदपठण करणाऱ्यांना आहार-विहार, आचार-विचार यांचे नियम फार काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यामुळे वेदविद्या उत्तम रीतीने शिकण्याकरिता गुरुकुल पध्दतीची आवश्यकता आहे. एक वेद शिकण्यासाठी सुमारे १२ वर्षाचा काळ लागतो. तसेच पाठांतर व योग्य उच्चार यांचे संस्कार बालपणीच्या संस्कारक्षम वयातच व्हावे लागतात. हे लक्षात घेऊन १९८८ साली ट्रस्ट तर्फे "वेदान्त" ही वास्तू बांधण्यात आली. सुमारे १०० विद्यार्थी गुरुकुल पध्दतीने शिकू शकतील एवढी सोय येथे विनामूल्य करण्यात आली आहे. शिक्षणासाठी विद्वान व आचारसंपन्न आचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मोफ़त वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुध्दीला तेज यावे म्हणून गाईचे दूध, तूप मुलांना दिले जाते. त्यासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावर स्वामी नृसिंह सरस्वती तपोवनात गोधन सांभाळले आहे.
वेदविद्येबरोबरच दुर्मिळ धार्मिक ग्रंथांचे जतन करुन, त्यांचे योग्य प्रकारे रक्षण करण्याचे कार्यही संस्थेने हाती घेतले आहे. दुर्मिळ असे अनेक ग्रंथ येथे जिज्ञासूंना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत.
वैदिक धर्म हा आचरणावर आधारित आहे. आजच्या काळानुसार तो कसा आचरावा ह्याचे गुरुदेवांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले ते "गुरुवाणी" आणि "अमृत कलश" या पुस्तक मालिकांतून प्रकाशित केले जाते. ह्या ग्रंथसंपदेद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे केले जाते. तसेच धर्माचे स्वरुप सामान्यजनांना उलगडून सांगण्यासाठी संस्थेतर्फे ज्ञानसत्रेही आयोजित केली जातात. ह्यासाठी श्री महालक्ष्मी मंडप ही भव्य वास्तू बांधण्यात आली आहे.
पुढील काळात सामान्य भक्तांना चिरंतन आधार मिळावा ह्यासाठी एक भव्य दत्तमंदिर बांधण्याचा संकल्प प.पू. सदगुरुंनी सोडला होता. तो गुरुदेवांनी भक्तांकरवी पूर्ण करुन घेतला. गुलाबी रंगाच्या बन्सी पहाडपूर दगडात, कोरीव कामाने सुशोभित अशा ह्या सुंदर मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शृंगेरी पीठाधीश्वर जगतगुरु श्री भारतीतीर्थ महास्वामी यांच्या परमपावन करकमलांनी दि. ११ जुलै २००७ रोजी संपन्न झाली. संपूर्ण भारताचे भूषन असे हे मंदिर सर्व दत्तभक्तांना श्रध्देचे व अभिमानाचे स्थान आहे.
या दत्तमंदिरातील देवदेवतांची त्रिकाल पूजा व आरती केली जाते. तसेच तेथील देवतांवर रुद्र, पवमान, पंचसूक्त इ. अभिषेक नित्य केले जातात. भक्तांतर्फे साधा अथवा दुधाचा अभिषेक, सहस्रनाम पाद्यपूजा, शाश्वत पूजा, लघुरुद्र केले जातात. याशिवाय श्रीदत्तदेवस्थान ट्रस्टतर्फे वेळोवेळी नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेश याग यांसारखी धार्मिक अनुष्ठानेही केली जातात. गुरुपौर्णिमा, श्री दत्तत्रेय जयंती, श्री शंकराचार्य जंयती आणि प.पू. गुरुदेवांची जयंती हे उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
श्री दत्त देवस्थानामध्ये गुरुचरणांचे दर्शन आपल्याला सकाळी ७ ते ११,दुपारी ३ ते ५ व रात्रौ ७.४५ ते ८.३० या वेळात होऊ शकते.

संस्थेचा पत्ता :
श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, श्री दत्तात्रेय निवास, वेदांत नगर, मनमाड रोड, अहमदनगर - ४१४ ००३.
दूरध्वनी : (०२४१)२४२३५८५, (०२४१)२४२४८७५.