Showing posts with label शनी शिंगणापूर. Show all posts
Showing posts with label शनी शिंगणापूर. Show all posts

Friday, 25 April 2014

श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, शिंगणापूर


अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.
येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.

येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.