Friday 25 April 2014

श्री क्षेत्र भगवानबाबा गड, पाथर्डी


भगवानबाबांचे पुर्वीचे नाव आबाजी तुबाजी सानप. सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड येथील ते मुळ रहिवासी होते. भगवानबाबांचा जन्म श्रावण वद्य पंचमी १८९६ साली झाला. भगवानबाबा लहानपणापासुनच अतिशय हुशार आणी चंचल होते. याच वयात त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत भगवानबाबा प्रथम दिंडीस गेले. पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिक महाराजांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिक महाराज हे त्यांचे प्रथम गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील बनकर स्वमी यांच्याकडे गेले त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. भगवानबाबांनी नारायणगडावर राहण्यांचा हट्ट धरला, तेव्हा माणिक महाराज म्हणाले मला काहितरी अनुग्रह दे म्हणुन भगवानबाबांनी  गडावरुन उडी मारली. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
काही काळ उलटल्यानंतर तेथीलच वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी बाबांना त्रास देण्यास सुरुवात केली व नारायणगड सोडून जाण्यास भाग पाडले. या सर्व प्रकारानंतर  बाबांनी तपश्चर्येस हिमालयात जाण्याचे ठरवले. तेव्हा खरवंडीचे बाजीराव पाटलांनी भगवानबाबांना ढुम्यागडावर येण्यासाठी आग्रह करुन घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले व सदमार्गाला लावले.
१९५८ साली यशवंतराव चव्हाण यांनी भगवानबाबागडावर श्री विठ्ठलाच्या मुर्तीची स्थापना करुन भव्य दगडी मंदिरही बांधले. तसेच गडावर भगवान विद्यालयाची स्थापनाही केली. भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसुन ज्ञानेश्वरी वाचली.
||बैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी.||
भगवानबाबांचा मृत्यु पौष-पोर्णिमा १९६५ साली झाला. पंढरपुर, पैठण अशा बऱ्याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.
भगवानबाबानंतर भीमसेन महाराज यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. त्यानी ४० वर्षे गडावर काढले. भगवानबाबांच्या चालिरिती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यु झाला. त्याच्यानंतर गडाचे तिसरे उत्तराधिकारी म्हणुन श्री डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची निवड झाली व तेथुन पुढे गडाचा विकास वाढिस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या.
नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापिठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.