Friday 25 April 2014

श्री क्षेत्र हनुमान टाकळी


श्री क्षेत्र हनुमान टाकळी ता. पाथर्डी येथे श्री संत समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते गोमयीन श्री रामभक्त हनुमानाची वरदह्स्ताची एक भव्य मुर्ती स्थापून आज ३५० वर्षे होऊन गेली. पुर्वकालापासून ते आजवरच्या इतिहासात देवमुर्तीचे निर्माणात, श्री समर्थांची ही एक क्रांतदर्शी, दिव्य दृष्टी प्रत्यक्ष गोमयातून देवत्व साकार करुन सकलजनांचे कल्याणार्थ, साधकास वा भक्त-भाविकास वांछित प्रसादप्रदायक उपासनेत तेजस्वी व उन्नत अनुभव देणारी त्याचप्रमाणे विशेष जागृतता, निर्मिणारी म्हणून दूरदूरवर सहजच प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे समर्थांच्या त्यावेळीच्या भारताच्या भीषण काळात या महान रामभक्ताने भारतभर ११०० मारुती व धर्मस्थाने निर्माण करुन भारताचे धर्म वैभव स्थिर केले.

सूज्ञांच्या मते हे स्थान हर्षवर्धनाच्या काळात झालेल्या एका महान यज्ञाची पावनभूमी म्हणून इतिहास नमूद आहेच. याच परिसरामध्ये उत्तरवाहिनी दोन नद्यांचा संगम पुराणकालापासून विशेष प्रसिध्द आहे. महर्षि भगवान व्यासांनी लिहिलेल्या अठरा पुराणांपैकी प्रथमचे गणले जाणारे पुराण ब्रम्हपुराण यामध्ये गोदावरीच्या दक्षिणकाठी ६० विशेष तीर्थ आहेच. पैकी वृध्दासंगम तीर्थ म्हणून एक विशेष अख्यायिका वृध्देश्वर देवालयासहित आलेली आहे. त्यात येथील सुंदर गुफेचाही उल्लेख आलेला आहे. हे सारे विचारात घेता श्री समर्थ रामदासांनी या पावनभूमीमध्ये त्या काळी टाकळीच्या झाडांचे जंगल असतानाही भक्ति-शक्ति दाता मारुती स्थापन करुन मोठाच धर्मोद्देश साधला आहे.


आज या परिसरात परंपरेने चालत आलेली आषाढ वद्य चतुदर्शीला रहाड यात्रा होत असते. या यात्रेत लांबून येणारे अबालवृध्द सहभागी होतात व विस्तवावरुन चालतात. हे येथील एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत ही पावनमुर्ती साध्या माळवदी व मातीचे मंदिरात खणात होती. परंतु विश्वानुभूती स्वांगाने घेणारे महान संतद्वय श्री समर्थ रामदास स्वामी व श्री संत मोरेश्वरनाथ अर्थात श्री बाबा महाराज आर्वीकर श्री क्षेत्र मोक्षधाम माचणूर या दिव्यत्म्यांनी टाकळीच्या हनुमान मंदिराचा जिर्नोध्दार करावा म्हणून श्री माधव स्वामी यांना सुचित केले. या मंदिर जीर्णोध्दाराच्या कामाचा प्रांरभ माघ शुध्द पोर्णिमा दि. ९ फेब्रुवारी २००९ रोजी होत आहे.